मुंबई - सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर ईडीच्या वतीने सुनील गोस्वामी यांनी युक्तिवाद करताना असे म्हटले, की सचिन वाझे हे प्रभावी व्यक्ती आहेत. तसेच, या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणी आज जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल आता 18 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सचिन वाझे यांच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला. (Suspended police officer Sachin Vaze) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणात वाझेंना अटक करण्यात आलेली नाही असे सांगत वाझे पुराव्यांशी छेडछाड किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नसल्याची हमी वकिलांनी न्यायालयाला दिली आहे. सचिन वाझे पुराव्यांशी छेडछाड करू शकतो अशी चिंता तपासयंत्रणेनं व्यक्त केली असून, त्यांच्या जामीनाला विरोध केला आहे.
लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा - बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर, दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेंनी तपासादरम्यान सांगितले होते.
यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल - सचिन वाझे यांनी अँटिलिया प्रकरणात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास आव्हान दिले होते. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने सांगितले की ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे. सचिन वाझे यांनी दावा केला होता की हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. कारण यूएपीए अंतर्गत त्यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे. यापूर्वी केंद्राने सचिन वाझे यांच्या याचिकेला विरोध केला होता. त्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला मान्य नसल्याचे केंद्राने म्हटले होते. हे संपूर्ण प्रकरण मुंबईत घडले असल्याने ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात यावी असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते.
काय आहे प्रकरण - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.