मुंबई- शहर महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याच्या संशयावरुन त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याच्या चाचण्या करण्यात आल्या असून अहवाल आल्यावरच तो कोरोना बाधित आहे की नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कस्तुरबा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण भरती करण्यात येत आहेत. त्याचबरोबर चाचणी करण्यासाठी येथे येणाऱ्या संशयित रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे, रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, रुग्णालय परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला कोरोना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस कॉन्स्टेबल कैलास देसले (२२) हे गेल्या ५ दिवसांपासून रुग्णालयात बंदोबस्तावर होते. देसले यांना घशाला त्रास होत असल्याने त्यांची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोरोना असल्याच्या संशयावरून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
चाचण्यांचा अहवाल आल्यावर त्यांना कोरोनाची बाधा झाली की नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता आवश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये देखील कोरोना विषाणू पसरत आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा- CORONA : 'लॉक डाऊन'मुळे मद्यपींची तारांबळ...दारू मिळवण्यासाठी अनेक उठाठेवी