मुंबई - सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ भाजपचेच नाहीतर देशाचे मोठे नुकसान झाले आहे. देशात २००९ ते २०१४ या काळात काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यात तत्कालीन विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांचे मोठे योगदान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई भाजप प्रदेशाच्या 'वसंत स्मृती' इथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत मुख्यमंत्री बोलत होते .
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सुषमा स्वराज या लढाऊ वृत्तीच्या होत्या. जे काम मिळेल ते त्यांनी सचोटीने केले. मंत्री म्हणून अडचणीत असलेल्या भारतीय नागरिकांसह इतर देशातल्या नागरिकांनाही स्वराज यांनी मदत केली होती. त्यांच्या काळात इतर देशात कार्यरत असणाऱ्या भारतीय दूतावासांना अधिक महत्त्व होते. देशात पासपोर्ट कार्यालये उभारण्यात त्यांचा मोलाचा वाट होता. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य मंत्री म्हणून केलेले कामही उल्लेखनीय आहे.
शोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भय्याजी जोशी, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी आदी उपस्थित होते.