मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत. अशातच शिंदे गटाचे नेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे सेनेतील उरलेले १३ आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून त्यासोबत राष्ट्रवादीचे २० आमदार व काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली फोडाफोडीची चर्चा जोमाने होऊ लागली आहे.
पुढे उदय सामंत मात्र पडद्यामागे मुख्यमंत्री : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३ दिवसाच्या सुट्टीवर गेलेले असताना त्यावर स्पष्टीकरण देताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी सुट्टीवर गेलो नव्हतो, तर मी अनेकांना सुट्टीवर पाठवले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी काल एका दिवसात ६५ फायली क्लिअर केल्यामुळे त्यांच्या कामाचा वेग यातून दिसून येतो. याच कामाच्या वेगाबरोबर सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी या शिंदे यांच्या नजरेतून सुटत नाही आहेत. या अनुषंगाने उद्योग मंत्री, उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटातील उरलेसुरले १३ आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उदय सामंत यांनी जरी हे वक्तव्य केले असले तरी, त्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्याची राजकीय खेळी असल्याचे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीतील बिघाडीचा फायदा? : मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये विविध मुद्द्यांवर खलबत्त सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची वाढत चाललेली जवळीक ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना खटकत असून त्यावरून त्यांच्या अंतर्गत वाद सुरू आहेत. अशातच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना व काँग्रेस यांच्यामध्ये जुंपली असताना बारसू रिफायनरी प्रकरणावरून खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र या सर्व मुद्द्या वरून सध्या राजकीय वर्तुळात फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा घडत असताना उदय सामंत यांचे हे वक्तव्य बरच काही सांगून जातं.
भाजपा शिंदेंना कधी सोडणार? : उदय सामंत यांच्या या वक्तव्यावर बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या, सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, उदय सामंत हे अतिशय समजूतदार, सामंजस नेते आहेत, असा आमचा समज आहे. त्यामुळे काँग्रेसचे किती आमदार साथ सोडणार? आमचे किती आमदार फुटणार? राष्ट्रवादीचे किती आमदार सोडून जाणार? यावर भाष्य करण्यापेक्षा भाजप शिंदेंना कधी सोडणार? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायला हवे, असा टोला त्यांनी मंत्री, उदय सामंत यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंसोबत हे आमदार : आताच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र,आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुनील राऊत, आमदार नितीन देशमुख, आमदार कैलास पाटील, आमदार राहुल पाटील, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील प्रभू, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार रमेश कोरगावकर, आमदार रवींद्र वायकर, आमदार संजय पोतनीस, आमदार प्रकाश फातर्पेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार ऋतुजा लटके हे एकंदरीत १६ आमदार आहेत.