मुंबई - आगरीपाडा येथील वाईएमसीए ग्राउंडवर सीएए, एनपीआर आणि एनआरसीविरूद्ध महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी, तुम्ही सरकारविरूद्ध आंदोलन करत आहेत. तेव्हा आवर्जून केंद्र सरकार म्हणा कारण राज्याचे सरकार तुमच्या सोबत आहे, असा दिलासा त्यांनी या आंदोलक महिलांना दिला आहे.
यावेळी सुप्रिया सुळेंनी उपस्थित महिलांसोबत मनसोक्त संवाद साधला. महिलांच्या क्षमता अधोरेखीत करत त्यांनी आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या महिलांचे कौतुकही केले. त्यासोबतच, NRC कधीच लागू होणार नाही, असा शब्द त्यांनी आंदोलक महिलांना दिला. मुंबईविषयीचे त्यांचे प्रेमही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुंबई माझी जन्मभूमी आहे तर, पुणे आणि बारामती माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान आहे, असे सुळे म्हणाल्या.
तिहेरी तलाक कायद्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, " हा कायदा मुस्लिम महिलांना हवा आहे. मात्र, त्यांच्या पतीला गुन्हेगार ठरवणे आणि तुरूंगात टाकणे त्यांना मान्य नाही. कारण, त्यांचा पती हा केवळ त्यांचा पती नसून त्यांच्या मुलांचा बाप आहे. त्यांच्या मुलांना आपल्या वडिलांपासून दूर करणे त्यांना मान्य नाही. त्यामुळे या कायद्याअंतर्गत तिहेरी तलाक देणाऱ्या पतीचे कौन्सलिंग केले जावे किंवा दुसरा उपाय शेधला जावा मात्र तुरूंगात टाकणे टाळावे"