मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील (Maharashtra-Karnataka Border) 40 गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Karnataka CM Basavaraj Bommai) केलाय. सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
राज्यात वातावरण तापलेलं: दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेलं हे वक्तव्य भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे राज्यात वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. राज्यपालांनी शिवरायांचा केलेला अपमान जनतेने विसरावा आणि जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवावं, यासाठी भाजपनं बोम्मई यांना पुढे केलं आणि त्यांनी जतबद्दल वक्तव्य केलं, असा आरोप राऊतांनी केला आहे.
सुप्रिया सुळेंची टीका: केंद्र सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करत असल्यामुळे राज्यपाल, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि बसवराज बोमई यांची महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेने बघण्याची मजल जात असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्यपालांचं छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं होतं. ठिकठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलनंही करण्यात आली होती. या विषयावरून जनतेचं लक्ष विचलित व्हावं यासाठी बोम्मईंनी जतबद्दल वक्तव्य केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.