मुंबई Sunetra Pawar Banner: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात उमेदवार देण्याचं जाहीर केलं. बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार गट लढणार असल्यानं कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. अजित पवार गटाच्या मंत्रालय परिसर आणि पक्ष कार्यालय परिसरात माजी नगरसेविका प्रतिक्षा राजू घुगे यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघ भावी खासदार असा उल्लेख देखील करण्यात आल्यानं हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधत आहे. (Baramati Lok Sabha Constituency)
बारामती पवार विरुद्ध पवार? अजित पवार गटाच्या कर्जत येथील मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या लोकसभेच्या चारही जागा आपण लढणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशा प्रकारचं चित्र सध्या रंगत आहे. बारामती मतदारसंघांमध्ये पवार विरोधात पवार असा सामना रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असणार आहे याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या यावर राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय.
उमेदवारी बाबत संभ्रम: बारामती मतदारसंघातून कोणताही पक्ष निवडणूक लढू शकतो. कारण आपल्या देशात लोकशाही आहे. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. आपण लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आले असून दोन वेगळे विचार असतात. लढाई वगैरे काही नसते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. तर भाजपाच्या हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने घेतला. महायुती म्हणून काम करावं लागेल पण असा काही निर्णय झाला नसल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.
कार्यकर्त्यांच्या भावना उमटल्या: लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अजित पवार यांच्या गटाकडून बारामती मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाईल हे जरी आता स्पष्ट नसलं तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना मात्र बॅनरच्या माध्यमातून झळकत आहेत. राजकारणात पवार नावाला राजकीय वलंय असल्यानं नाव, सोशल पोस्ट असो की अगदी बॅनर असो चर्चा तर होणारच.
हेही वाचा: