मुंबई : रविवारची रमणीय पहाट आणि या पहाटेचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोटलेली मुंबईकरांची गर्दी मरीन ड्राई परिसरात पाहायला मिळते. हे दृश्य प्रत्येक रविवारी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये दिसून येते. विशेष करून सुरुवातीला मॉर्निंग वाॅकच्या निमित्ताने या परिसरामध्ये फेरफटका मारण्यासाठी येणारे मुंबईकर आता मॉर्निंग वॉकसोबत संगीताचा आनंद लुटताना दिसून येतात.
गाण्यांमध्ये मंत्रमुग्ध झालेली दिसून येते : मुंबईतील तरुणांचे अनेक ग्रुप येथे स्वतः संगीत वाजवून त्यांचा आनंद घेण्यासोबत इतरांना या संगीताच्या तालावर ठेका धरण्यास भाग पाडतात. या तरुणांच्या संगीताची जादू ऐकून यांच्याकडे लोक फिरकणार नाहीत हे होऊ शकत नाही. कारण आपोआपच या संगीताच्या तालावर लोक यांच्याकडे आकर्षिले जातात. 1970 च्या दशकातील जुनी गाणी असतील किंवा आत्ताची लेटेस्ट मॉर्डन गाणी असतील, सर्व प्रकारच्या गाण्यांवर वाद्य वाजवत ही तरुणाई त्या गाण्यांमध्ये मंत्रमुग्ध झालेली दिसून येते.
संडे स्ट्रीट संकल्पना : याविषयी बोलताना हे नवीन युवा संगीतकार सांगतात की, मुंबईतील विविध भागातून आम्ही सर्व येथे रविवारी सकाळी जमा होतो. आमच्याकडे जी काही संगीत वाद्य आहेत, कुणाकडे गिटार आहे, कोणाकडे बासरी आहे, कोणाकडे ड्रमपेट आहे, पियानो आहे ही विविध वाद्य घेऊन आम्ही इथे येतो आणि संगीताची मैफल सुरू करतो. लॉकडाऊन पासून जेव्हा येथे संडे स्ट्रीट ही संकल्पना सुरू झाली, तेव्हापासून अनेक लोक या संडे स्ट्रीटचा आनंद लुटण्यासाठी इथे येत असतात.
गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे : विशेष करून भल्या पहाटे ही लोक इथे येत असल्याने त्यांचे आश्चर्य सुद्धा वाटते. कारण संगीत सुद्धाअशी एक जादू आहे की ती सर्वांना वेड लावत असते. कितीही दुःख असले तरी सुद्धा या संगीताच्या जादूने ते दूर सारण्याचा प्रयत्न केला जात असतो. आपण बघत असाल की, मरीन ड्राइव्हवर येणारी गर्दी ही दिवसेंदिवस प्रत्येक रविवारी वाढत चालली आहे. विशेष करून संगीत ऐकण्यासाठीच बरेच चाहते मुंबईकर येथे येत असतात.
संगीताची जादू हा अनोखा उपक्रम : पहाटेचा मॉर्निंग वॉक आणि त्यामध्ये संगीताची जादू हा अनोखा उपक्रम आता सुरू झालेला आहे. याबाबत बोलताना युवा संगीत प्रेमी किरण पाठारे म्हणतो की, कुणाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा असेल तर त्यासाठी संगीताच्या जादूची किमया काम करते. येथे सर्वच प्रकारची गाणी सादर केली जातात. पण विशेष करून आम्ही जास्त करून अशी गाणी वाजवतो ज्यावर तरुणाई नाचू शकेल, असेही किरण पाठारे म्हणतो.
हेही वाचा : Tips To Gain Weight : निरोगी वजन वाढवण्यासाठी वापरून पहा 'या' टिप्स