मुंबई Sudhir More Suicide Case : एक सप्टेंबर 2023 रोजी शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे ( Sudhir More Suicide ) यांनी रेल्वे रुळावर घाटकोपर इथं आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी महिला वकील जबाबदार असल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सत्र न्यायालयानं या महिला वकिलाला संरक्षण नाकारलं. त्या संदर्भात महिला वकिलानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयानं बुधवारी नकार दिला आहे. '56 कॉल मृत होण्याच्या आधी त्यांना केले जातात, म्हणूनच चौकशीची गरज आहे' असं म्हणत न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या एक सदस्य खंडपीठानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
महिला वकिलावर अटकेची टांगती तलवार कायम : अटकेच्या भीतीमुळे वकील महिलेनं सत्र न्यायालयामध्ये देखील धाव घेतली होती. सत्र न्यायालयानं वकील महिलेचा जामीन अर्ज नाकारला आहे. त्यामुळे वकील महिलेला जामीन मिळावा, यासाठी ज्येष्ठ वकील मुंदर्गी यांनी जोरदार बाजू लढवली होती. आता मुंबई उच्च न्यायालयानं देखील जामीन अर्ज नाकारला. "मृत्यूच्या आधी 56 कॉल त्यांना केले जातात म्हणजे चौकशीची गरज आहे" असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील महिलेला दाद मागण्याशिवाय पर्याय नाही, तोपर्यंत या महिला वकिलावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
मृत सुधीर मोरेंच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल : सर्वोच्च न्यायालयामध्ये महिला वकील अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी धाव घेऊ शकतात. याचा अंदाज घेऊनच मृत शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचे वकील संदीप सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी कॅवेट दाखल प्रक्रिया सुरू केली. सुधीर मोरे यांची बाजू ऐकल्याशिवाय महिला वकिलाच्या अर्जावर सुनावणी करू नये" अशी मागणी देखील त्यात केल्याचं त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं.
काय आहे सुधीर मोरे आत्महत्या प्रकरण : १ सप्टेंबर 2023 रोजी घाटकोपर विद्याविहारमध्ये रेल्वेच्या उपनगरी रेल्वे मार्गावर सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचं शेवटचं बोलणं वकील महिलेसोबत झालं होतं. ही वकील महिलाच आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं सुधीर मोरे यांच्या मुलाचं म्हणणं आहे. तसा आरोप करत त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.
हेही वाचा :