मुंबई : जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगामुळे मानसिक आणि शारीरिक स्वस्थता मिळते. मन आणि शरीर योगामुळे निरोगी राहते असा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन 2014 पासून सुरु करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय योग उत्सवांमध्ये सहभागी होणार आहेत तसेच त्याचे नेतृत्व करणार आहेत. त्या निमित्ताने विधानभवनातील प्रांगणामध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून या ठिकाणी मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. बुधवारी सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये या ठिकाणी प्रात्यक्षिके केली जाणार असून राज्यपाल रमेश बैस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि अन्य मंत्री तसेच अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योगा : यंदाही योग दिनाची सर्व तयारी जोरात सुरू आहे. यावर्षी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून रोजी नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग सत्राचे नेतृत्व करतील. त्याचबरोबर दिल्लीतही अनेक ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी योग दिवसाला ऐतिहासिक बनवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान न्यूयॉर्कमध्ये करणार योगा : केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी योग दिनानिमित्त दिल्लीत विशेष तयारी करण्यात आली आहे. योग दिनानिमित्त कर्त्यपथ, लाल किल्ला, सेंट्रल पार्क, कॅनॉट प्लेस, नेहरू पार्क, लोधी गार्डन, कोरोनेशन पार्क यासह 26 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. NDMC दिल्लीत 8 ठिकाणी योग दिनाचे आयोजन करणार आहे, तर DDA दिल्लीत 17 ठिकाणी योग दिनाचे आयोजन करणार आहे. याशिवाय पुरातत्व विभाग लाल किल्ल्यावरून योग दिन साजरा करणार आहे. मात्र, यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या मातीतून २१ जून रोजी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पंतप्रधान योग दिनानिमित्त देशाबाहेर असतील. यावर्षी, आंतरराष्ट्रीय योग दिनाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रातील 180 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींसोबत योग करणार आहेत.
योग दिनाची थीम : दरवर्षी योग दिनासाठी वेगळी थीम ठेवली जाते. वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर 2023 साली योग दिनाची थीम एक जग, एक आरोग्य अशी ठेवण्यात आली आहे. ही थीम आयुष मंत्रालयाने निवडली आहे. योग हा निरोगी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. योग हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी योग करून स्वतःला निरोगी ठेवत असत.
हेही वाचा - International Yoga Day : लहानापासून थोरापर्यंत योग अॅडवायझेबल, स्वतःसाठी किमान 1 तास काढावा