मुंबई- कोरोना सारख्या महामारीतही महापालिकेच्या नायर रुग्णालयांत आतापर्यंत १००१ कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसूती केली आहे. याप्रकरणी राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य
गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला. एप्रिल २०२०मध्ये नायर रुग्णालय हे कोरोना म्हणून घोषित करण्यात आले. मागील वर्षी १४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रसुती झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एक हजार कोरोनाबाधित मातांनी १०२२ बालकांना जन्म दिला आहे. यामध्ये तिळे आणि १९ जुळ्या बालकांचा समावेश आहे. मागील एक वर्षात रुग्णालयात झालेल्या १००१ प्रसूतींपैकी ५९९ बालकांचा जन्म सामान्य प्रसूतीद्वारे झाला. तर ४०२ जणांचा सिझेरियन पद्धतीने झाला. तीन विभागातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र, नवजात आणि बालरोगशास्त्रज्ञ आणि अॅस्थेसिओलॉजी या विभागांनी यासाठी अथक परिश्रम केले, असे महापालिकेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.
एक वर्षात अनेक बालके कोरोनाबाधित
आई कोरोनाबाधित असेल तर जन्मलेल्या बाळाचीही कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. मागील एक वर्षात अनेक बालके कोरोनाबाधित आढळली, परंतु त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, या बालकांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, असे महापालिकेने आपल्या पत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा- एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात 1.6 टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ