मुंबई - नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 18 खासदारांसह रविवारी अयोध्या दौरा केला आणि राम मंदिर उभारणीचा प्रश्न पुन्हा उचलून धरला. त्यानंतर मंगळवारी उध्दव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
तासभर सुरू असलेल्या भेटीत राम मंदिर उभारणी बाबत चर्चा करण्यात आली. न्यायालयात जागेबाबत जो बाकी निर्णय होईल, त्यावेळी त्या जागेचा निर्णय घेतला जाईल. राम मंदिरांच्या ज्या जागेचा वाद नाही, त्या जागेवर मंदिर बनविण्यास सुरुवात करावी, असे त्यांनी उध्दव ठाकरेंना म्हटल्याचे सांगितले.
जमिनीचे राष्ट्रीयकरण नरसिंह राव यांनी केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. विवादित व अविवादित जमिनीचे सरकारने राष्ट्रयीकरण केले आहे. कोणाचीही परवानगी न घेता सदर जमीन मंदिर बनवायला देता येऊ शकते. यात दोन पक्ष आहेत एक राम जन्मभूमी न्यास समिती आणि दुसरी विश्व हिंदू परिषद. या दोघांना मंदिर बनविण्यासाठी जमीन देण्यात यावी. राम मंदिराचा प्रश्न यामुळे निकाली निघू शकतो. भाजप सरकारला, मोदींना कोणी चुकीचा सल्ला देत आहेत, असे ते म्हणाले. राम मंदिर बनविण्यासाठी मोदी सरकार विलंब करत असल्याचे माझे मत असल्याचे स्वामी म्हणाले.
मशीद अयोध्येच्या बाहेर बांधावी त्यासाठी आम्ही त्यांना भरपाई देऊ. उद्धव ठाकरेंबरोबर इतर घटक पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करू. राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.