मुंबई - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली आहे.
देशात सर्वाधिक प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत १९६६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी व राज्याचे लाचलुचपत विभागाचे प्रमुख संजय बर्वे आणि १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी व राज्याचे कायदा सुव्यवस्थेचे प्रमुख परमबीर सिंग हे २ अधिकारी मुंबई पोलीस आयुक्तपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. परमबीर सिंग यांची पोलीस खात्यातील प्रतिमा ही हाय प्रोफाइल आयपीएस अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहे. परमबीर सिंग हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे व मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती ही निश्चित मानली जात होती. मात्र, सेवाज्येष्ठतेनुसार संजय बर्वे यांची वर्णी गृह खात्याकडून करण्यात आली आहे. संजय बर्वे यांची वर्णी मुंबई पोलीस आयुक्तपदी येत्या सप्टेंबरपर्यंत असल्याने त्यांनंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून संजय बर्वे व परमबीर सिंग यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.