मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. नववी आणि दहावीच्या आंतरीक गुणांचा आधारावर मूल्यमापन करून दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आज सादर केला असून याबाबद लवकरच याची घोषणा केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला प्रस्ताव -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर परीक्षा न घेण्यावर न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. तसेच विद्यार्थ्यांचे गुणांचे मूल्यमापन कसे केले जाणार, असा प्रश्न राज्य सरकरला विचारला होता. मात्र, राज्य सरकार परीक्षा न घेण्याचा निर्णयावर ठाम राहिले आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे आणि न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिक्षण विभागाकडून कसे उत्तर द्यायचे, याबाबत राज्याचे शिक्षण सचिवांनी सतत दोन दिवस महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची बैठकी पार पडल्या आहेत. तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा बैठकी घेतल्या होता. अखेर नववी आणि दहावीच्या आंतरीक गुणांचा आधारावर मूल्यमापन करून दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केल्याची माहिती स्वतः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आज सादर केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
उद्या भूमिका स्पष्ट करणार -
दहावीची परीक्षा घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार राज्य सरकार न्यायालयात प्रतिज्ञापत्र आणि शासन निर्णय सादर करणार आहे. याबाबत आमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता, तातडीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. याबाबत आम्ही उद्या भूमिका स्पष्ट करू, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे वडील आणि आई दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलेल, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.