मुंबई - येथे गुरुवारी सुधारित नागरिकत्व विधेयक आणि एनआरसीच्या अंमलबजावणी विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विद्यार्थ्यांचा सहभाग हा लक्षणीय होता. त्यातही मुंबई बाहेरून शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्याला आलेले अनेक विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.
दिल्लीतील जमिया मिलिया इस्लामीया विद्यापीठात नागरिकत्व विधेयक आणि एनआरसी या दोन कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला होता. त्याचे पडसाद देशभरात उमटले. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. मुंबईत झालेल्या मोर्चातही ऑगस्ट क्रांती मैदानात जमलेल्या विद्यार्थांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.
हेही वाचा - CAA विरोध: ऑगस्ट क्रांती मैदानावर जनसागर; मोदी सरकारविरोधात तीव्र संताप
गुरुवारी मुंबईसह राज्यात भाजप सरकार नसल्यानेच हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करता आले, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने व्यक्त केली. दिल्ली प्रमाणेच बंगळुरूमध्ये आंदोलनकारी लेखक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक करून त्यांना डांबून ठेवण्यात आले होते. हे दोन्ही कायदे देशातील शांतता आणि स्थैर्याला बाधा पोहोचवणारे असल्याने ते त्वरित रद्द करायला हवेत, अशी मागणी या विद्यार्थांनी केली.
त्यासोबतच या मोर्चातून अपेक्षीत न्याय मिळाला नाही तरीही विद्यार्थी पुन्हा एकवटून याहून मोठे आंदोलन नक्की उभे करतील, असे मतही या विद्यार्थ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
हेही वाचा - 'भारतीय लोकशाहीचा योग्य सन्मान राखायचा असेल तर हा कायदा जायलाच हवा'