मुंबई- बॉम्बे केंब्रिज शाळा आठ दिवसांपासून बंद असून ती पुन्हा सुरु करावी, यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिवसेनेने आंदोलन सुरु केले आहे. अंधेरी पूर्व येथील जे. बी. नगर परिसरातील बॉम्बे केंब्रिज शाळेचा विद्युत पुरवठा अदानी कंपनीने आणि पाणीपुरवठा महापालिकेने बंद केला आहे. शाळेला अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. शाळा बंद असल्याने अडीच हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
शाळा सुरु करण्याची मागणी मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. बॉम्बे केंब्रिज शाळेची पाणीकपात आणि वीज कपात केल्याने व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवली आहे. आठ दिवसांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महापालिका प्रशासन आणि इतर सर्व अधिकारी यांच्याशी संपर्क करून शाळेला न्याय मिळवून द्यावा, यासाठी अंधेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, पालकांसह धरणे आंदोलन केले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात आमदार रमेश लटके, विधानसभा संघटक प्रमोद सावंत, समन्वयक मनोहर पांचाळ, शिवसेना संघटक कमलेश राय यांच्यासह शिवसैनिक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. शाळेची वीज आणि पाणी पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.