मुंबई - तंत्र शिक्षणापासून विविध प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणाच्या अंतिम वर्षांत आलेल्या आणि मागील काही महिन्यांपूर्वी कॅम्पस मुलाखती होऊन विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या कोरोनामुळे संकटात सापडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांचीही अशीच परिस्थिती असून देश विदेशातील अनेक कंपन्यांनी कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येते, तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होतील, असेही काही जाणकारांना वाटते.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम परीक्षा आणि त्यासाठीचा तिढा सुटण्यास वेळ लागला असल्याने बहुतांश कंपन्यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल येईलपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला सांगितली आहे, तर तब्बल १५ टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी कोणताही निरोप दिला नसल्याने कॅम्पस मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कॅम्पस मुलाखतीसाठी सर्वात जास्त चर्चेत असेलल्या मुंबई आयआयटीमध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या कॅम्पस मुलाखतीत १ हजार १७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यानी निवड केली होती, तर जागेवरच ११६ विद्यार्थ्यांना मुलाखतीपूर्वीच नोकरी दिली होती. राज्यातील तब्बल ४०० विविध प्रकारच्या व्यावसायिक महाविद्यालयातील ९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट आणि नोकरी मेळाव्यातून नोकरीची ऑफर मिळाली होती. यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांवर कोरोनाने संकट उभे राहिले आहे, असे राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आयआयटी मुंबईतील जाणकारांकडून सांगण्यात आले.
आयआयटीसह राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कॅम्पस मुलाखती झाल्या होत्या त्यांना ऑगस्ट महिन्यात नोकरीवर रूजू करणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनने असंख्य कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. यामुळे अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना पुढील कोणताही प्रतिसाद दिला नाही, तर केवळ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, ईलेक्ट्रोनिक्स आदी क्षेत्रातील केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीने कॅम्पस मुलाखतीत निवड केलेल्यांना रुजू करून घेऊ, असा विश्वास दिला आहे.
संख्यी सोल्युशनच्या एचआर स्वाती लोखंडे म्हणाल्या की, आम्ही येत्या काही दिवसांत ज्या विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड केली होती, त्यांना ऑलनाईन कामे देऊन तोपर्यंत नोकरीची संधी देणार असल्याचे त्या म्हणाल्या. आयआयटी मुंबईतील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे बंद असल्याने डिसेंबरमध्ये ज्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑफर दिली होती, त्यासंदर्भातील माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे आयआयटीच्या प्रसिद्धी प्रमुख फाल्गुनी यांनी सांगितले.
या कंपन्यांनी केली होती निवड -
आयआयटी मुंबईसोबत राज्यात असलेल्या अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, संशोधन आदींचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालय आणि समूह विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत देश-विदेशात असलेल्या कंपन्यांकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अॅमेझॉन, कॅप्जेमिनी, सेलेक्ट कंट्रोल, गूगल, टेक महिंद्रा एनएसई, वॉलमार्ट लॅब, व्हीएम व्हेर, आयबीएम, टाटा, डेलॉयट, जेपी मॉर्गन चेस, फ्लिपकार्ट, बिजूज, ग्रूफर्स आणि बिगबास्केट आदी कंपन्यांचा समावेश आहे. या मुलाखतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून नोकऱ्यांची ऑफर देण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना कौशल्य वाढविण्यात गरज -
अंतिम वर्षांच्या प्लेसमेंटमध्ये यंदा दहा ते पंधरा टक्के घसरण झाली असली तरी के. जी. सोमय्या इंजिनिअरिंगमध्ये चांगली प्लेसमेंट झाली आहे. येणाऱ्या काळात ईलेक्ट्रीकल व्हेईकल, ऑटोमेशन, रोबोटीक आदी सोबतच ऑप्टोमिक टेक्नॉलॉजीमध्ये संधी मिळणार आहे. कोरोनाच्या काळात काही कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीने संधी सुरू ठेवली आहे. काही कंपन्यांनी कोरोनामुळे उशिराने रूजू करण्याची तयारी दर्शवली असल्याचे के. जी.सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजचे ईलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ.जगन्नाथ निर्मळ यांनी सांगितले.
कोरोनामुळे अनेक कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाले आहेत. बऱ्याच कंपन्यांचे रोजगार बंद झालेल्या आहेत, तरीही काही कंपन्यांच्या एचआरशी माझे बोलणे झाले असून या कंपन्या सप्टेंबरपर्यंत नवीन भरती करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, येत्या काळात विद्यार्थ्यांना आपले कौशल्य वाढवावे लागेल, असे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर संजय जाधव यांनी सांगितले.