मुंबई- महानगरपालिकेतर्फे पाली टेकडी जलाशयाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम येत्या ३ आणि ४ नोव्हेंबरला केले जाणार आहे. त्यामुळे, या दोन दिवशी सांताक्रुझ, खार व वांद्रे (पश्चिम) या तीन भागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या भागातील परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयाचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम करताना येथील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पाली गावठाण, न्यू कांतवाडी, शेरली राजन, पाली उदंचन क्षेत्र वांद्रे मधील काही भाग सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान, हनुमान नगर, लक्ष्मी नगर, प्यारी नगर, युनियन पार्क, कार्टर रोड येथील पाणी पुरवठा दुपारी २ ते सायंकाळी ५ दरम्यान आणि चुईम गावठाण, खारदांडा तसेच खार परिसरातील काही भागात सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या कालावधीत कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा- 'केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात ३१ ऑक्टोबरला काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह'