मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्रात रविवारी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीची मुंबईत कडक अंमलबजावणी झाली. मुंबईत पोलिसांनी अनेक ठिकाणी जाऊन दुकाने बंद केली. तर काही ठिकाणी दुकानदारांनी स्वतः दुकाने बंद करून संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन केले.
संचारबंदीला मुंबईकरांचे सहकार्य -
होळी आणि धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. रात्री साडेसात वाजता दादर, भायखळा, लालबाग, परळ, कुर्ला, सांताक्रुज यासारख्या महत्वपूर्ण बाजारपेठांमधील दुकाने बंद करण्याची सुरुवात झाली होती. 8 वाजेपर्यंत बाजारपेठांतील दुकाने बंद करण्यात आली होती. तर, ज्या परिसरात 8 नंतरही दुकाने सुरू होती. तिथे पोलिसांनी जाऊन दुकाने बंद केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर लालबाग परिसरात दुकानदारांनी याला चांगला प्रतिसाद दिला.
![मुंबईत दिवसभर रेल्वे गाड्या रिकाम्याच धावल्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-night-corfue-7209757_28032021234404_2803f_1616955244_966.jpg)
दिवसभर रेल्वे गाड्या रिकाम्या -
होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने रविवारी असलेला नियमित मेगाब्लॉक रद्द केला होता. तरी सुद्धा दिवसभर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या रिकाम्या धावल्या. तसेच, रस्त्यावर वर्दळही खूप कमी प्रमाणात दिसून आली. मात्र, काही प्रमाणात दुपारी खासगी वाहन घेऊन नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचेही दिसले. एकंदरीत मुंबईकरांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांत आणि सुरक्षित होळी साजरी केल्याचेही दिसले.
विना मास्क 500, तर थुंकणाऱ्याला 100 रूपये दंड -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. त्यानुसार, कालपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली. ही जमावबंदी 15 एप्रिल 2021 पर्यंत असणार आहे. नव्या आदेशानुसार, नियम मोडल्यास एक हजार रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. सार्वजनिक उद्याने, समुद्र किनारे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, बाहेर विना मास्क आढळलेल्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याला 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच, कुठल्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी असणार आहे. विवाह समारंभासाठी 50 व्यक्तींना परवानगी असणार आहे. तर, अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 व्यक्तींना परवानगी असणार आहे.
हेही वाचा - नागपुरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, ६० ठिकाणी बंदोबस्त
हेही वाचा - 'द एव्हर गिव्हन' : सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजाची अखेर सुटका