मुंबई - प्रचंड महाग मिळत असलेल्या, मत्स्यप्रेमींना सुखावणाऱ्या आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या पापलेट व बोंबीलच्या उत्पादनात प्रचंड मोठ्या प्रमाणावर घट निर्माण झाली आहे. या माशांच्या प्रजनन काळात मासेमारीबंदीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास येत्या काही वर्षांमध्ये पापलेट आणि बोंबील नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निर्यातक्षम पापलेट व बोंबीलची राज्यासह जगभरात निर्यात करणाऱ्या राज्यातील पापलेट उत्पादनात गेल्या हंगामात 400 टनांची घट झाली आहे.
मत्स्यसंवर्धनासाठी आणि लोकांच्या मागणीसाठी प्रजनन काळात मासेमारीबंदी केली जाते. मात्र फायद्यासाठी त्या काळातही ट्रॉलर व पर्ससिन पद्धतीने नियमांचे उल्लंघन करून पापलेट मिळवण्यासाठी बेसुमार मासेमारी केली जात आहे. अनेक कमी आकारांच्या पापलेट पिल्लांची व बोंबीलची बाजारांमध्ये विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पापलेट व बोंबील उत्पादनावर परिणाम होतो. म्हणूनच प्रजनन काळात मासेमारी बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मच्छीमारांकडून मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत १ जून ते ३१ जुलैदरम्यान मासेमारीबंदी केली जाते. १ ऑगस्टनंतर नारळी पौर्णिमा किंवा हवामानाची अनुकूलता पाहून मासेमारीचा नवीन हंगाम सुरू होतो. परंतु मागणी व काही मासेमारांचा लोभ पाहता मासेमारीच्या पहिल्या हंगामामध्ये म्हणजेच ऑगस्टपासून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान लहान पापलेटची व बोंबीलची मासेमारी विशिष्ट आसाच्या बारीक जाळ्याने केली जात आहे. त्यामुळे मासेमारी हंगामाच्या आरंभी लहान पापलेट व बोंबीलची मासेमारी केल्यामुळे भविष्यात या प्रजातींचे मासे पाहायलाही मिळणार नाहीत असे चित्र आहे.