मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणींबाबत शासनाला वेळोवेळी जाणीव करून देवून देखील शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. याच्या निषेधार्थ आज सलून दुकानांबाहेर काळ्या फिती बांधून शासनाचा राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशन निषेध करणार आहे.
सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले तर आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सलून व्यावसायिक व नाभिक समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील गावापासून शहरापर्यंत सलून दुकानांबाहेर काळ्या फिती लावून आणि बॅनर घेऊन सलून मालक आणि कामगार उभे राहणार आहेत. आम्ही सरकारच्या विरोधात नाही आहोत. मात्र, आम्ही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज 10 ते 11 या वेळेत काळी फित बांधून आणि फलक घेऊन निदर्शने करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सुरक्षित अंतर राखून हे आंदोलन होणार असल्याचे सचिव चव्हाण यांनी सांगितले. गेले 2 महिने सलून बंद आहेत. अनेक दुकानदारांची वाईट परिस्थिती आहे यामुळे आता तरी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असेही चव्हाण यांनी संगितले.