मुंबई - बांधावर राहणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा मोबदला मिळत नव्हता. त्यासाठी परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शेतामध्ये पिकलेली फळे, भाज्या यांच्या विक्रीसाठी वाहतूक परवानगी देण्यात आलेली आहे. परिवहन विभागाने जाहीर केलेल्या फॉर्मची माहिती घेऊन प्रत्येक तालुक्याच्या आरटीओ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी केले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे परिवहनच्या कार्यालयात न जाता घरीच इमेलवरून आपण फॉर्म भरू शकता आणि ई-मेलवरूनच परवानगी देखील मिळेल, असेही परिवहन आयुक्त चन्ने यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
परिवहन विभागाकडून मिळालेली परवानगीची प्रत जवळ (ड्रायव्हर) बाळगावी लागेल. शेतकरी शेतमाल मोठ्या शहरातही विक्रीसाठी घेऊन जाऊ शकतात. त्या शहरात शेतमालाची विक्री करताना कोरोना साथीचे सर्व नियम पाळावे लागतील. ज्या शेतकऱ्यांचे खरबूज, कलिंगड आणि नाशवंत होणारा भाजीपाला तयार असेल त्यांना संधी मिळाली आहे. त्याचा फायदा करून घ्यावा. निदान आपला उत्पादन खर्च तरी भरून निघेल, असे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी केले आहे.