मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जुलै-ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या www.maharesult.nic.in संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. तर, विद्यार्थ्यांना आपला हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
राज्यभरात असलेल्या शिक्षण मंडळाच्या मुंबई, कोकण, नाशिक औरंगाबाद, अमरावती, लातूर, नागपूर, कोल्हापूर, पुणे या 9 विभागीय मंडळातून दहावीच्या पुरवणी परीक्षेला 2 लाख 34 हजार 631 विद्यार्थी बसले होते. यामध्ये मुंबई विभागीय मंडळाकडून 57 हजार 784 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मागील आठवड्यात जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. यातच आज जाहीर होणाऱ्या दहावीच्या निकालातही असेच चित्र असेल काय अशी चर्चा सुरू आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे. त्यांना, 31 ऑगस्ट 19 सप्टेंबर या कालावधीत दरम्यान संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येणार आहे.
तर दुसरीकडे आज दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी यशस्वी होतील. त्यांना अकरावीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेश मिळण्यासाठी अकरावीची विशेष ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी 3 सप्टेंबर पासून दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. तर, त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांनाही अकरावीच्या प्रवेशाची मुभा राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात येणार आहे.