मुंबई - मानखुर्द येथील गतिमंद मुलांसाठी असणाऱ्या चिल्ड्रन्स होम सोसायटीतील 29 मुलांना आज (रविवार) दुपारी बीकेसी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलांना कोरोनाची लागण झाल्याने आता कोविड सेंटरकडून या मुलांची 'विशेष' काळजी घेतली जात आहे. अगदी त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी पुस्तक, चॉकलेट मागवण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना सांभाळण्यासाठी स्पेशल अटेंडेन्सही बोलावण्यात आल्याची माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली आहे. तर या सर्व मुलांची तब्येत ठीक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मानखुर्द येथील होममध्ये 268 गतिमंद वास्तव्य करतात. यात लहान मुलांपासून काही ज्येष्ठांचाही समावेश आहे. या होममधील काही मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांना मुंबई महानगर पालिकेकडून अंदाजे 80 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत 29 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. या मुलांना रविवारी बीकेसी कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. या मुलांचे वय 12 ते 20 च्या दरम्यान आहे. यातील केवळ 4 मुलांना सौम्य लक्षणे असून उर्वरित मुलांना काही लक्षणे नाहीत. पण ही मुले विशेष असल्याने कोरोनामध्ये त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना स्वतः हून अनेक गोष्टी करता येत नसल्याने, कोरोनाबाबत वा कुठल्याही आजाराबाबत त्यांना कितपत जाण आहे हा प्रश्न असल्याने त्यांना क्वारंटाइन न करता कोविड सेंटरमध्ये दाखल करत त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे.
सर्वप्रथम त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या मुलांना सांभाळण्यासाठी स्पेशल अटेंडेन्सची गरज असते. त्यामुळे नर्स-वॉर्डबॉयबरोबर स्पेशल अटेंडेन्स स्टाफ मागवण्यात आल्याचे डॉ. डेरे यांनी सांगितले आहे. मुलांना औषध-गोळ्या दिल्या जात आहेत. पण त्याचबरोबर त्यांना चॉकलेटही दिली जात आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचा वेळ मजेत जावा यासाठी गोष्टीची पुस्तकेही आणण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक अशा विशेष डॉक्टरांचीही मदत या मुलांसाठी घेतली जात आहे. दरम्यान केवळ 4 मुलांना सौम्य लक्षणे असून उर्वरीत मुलांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे ही सर्व मुले आठवड्याभरात ठणठणीत होतील. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करत निगेटिव्ह आलेल्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. त्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करावे लागणार आहे. तशी सोय त्यांच्या होममध्ये आहे का हे पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल असेही डेरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या मुलांना कोरोनाची लागण कशी झाली याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात होम्सच्या इनचार्ज मानसी सावंत आणि येथील डॉक्टर डॉ. जयेश वसुले यांच्याशी संपर्क साधला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.