मुंबई - दरवर्षी पावसाळयात रेल्वे मार्गावर पाणी साचलण्याने रेल्वे प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये अडकून राहत होते. या अडचणीच्या परिस्थितीतून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या बचाव पथकांवर रेल्वेला अवलंबून रहावे लागत होत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेने अत्याधुनिक बचाव बोटी खरेदी करून रेल्वेचे स्वत:चे बचाव पथक तयार केले आहे. या पथकांचे नुकतेच अंबरनाथ येथील जीआयपी धरणात प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात अग्निशमन दल, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस जवानांचा समावेश होता.
एनडीआरएफच्या मदतीने विशेष प्रशिक्षण
मुंबई विभागात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पाण्यात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेला प्रत्येकवेळी शासकीय किंवा एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीची वाट पहावी लागत होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने २०१९ मध्ये १८ बोटी आणि १५० लाइफ जॅकेट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता. या १८ बोटीपैकी मध्य रेल्वेच्या ताफ्यात ५ बोटी दाखल झालेल्या आहेत. तसेच रेल्वेने पूर नियंत्रण पथकासाठी विशेष प्रशिक्षित जवानाचे तीन पथक तयार केले आहेत. पूर बचाव पथकासाठी रेल्वे सुरक्षा दलातील १५ जवानांना एनडीआरएफच्या मदतीने विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यंदा पावसाळ्याच्या आधी अंबरनाथ येथील जीआयपी धरणात प्रशिक्षण वर्ग भरविण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात अग्निशमन दलाचे एक पथक, रेल्वे सुरक्षा दलाचे तीन पथक आणि लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांचे एका पथकाचा समावेश होता. तब्बल साडेतीन तास जीआयपी धरणात सर्व जवानांना एनडीआरएफच्या मदतीने विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहेत.
स्वतःचे पूर बचाव पथक
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०१९ रोजी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये वांगणी ते बदलापूर स्थानकादरम्यान पाण्यात अडकली होती. पाण्यात अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेला शासकीय किंवा एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीची वाट पहावी लागली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने स्वतःचे पूर बचाव पथक तयार करत बचाव बोटी आणि १५० लाइफ जॅकेट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात ५ बोटी आहेत. लवकरच उर्वरित ५ बोटी दाखल होणार आहेत. या रेल्वेच्या बचाव बोटी अपघात निवारण ट्रेनमध्ये (एआरटी) ठेवण्यात येणार आहे. एका बोटीत पाच प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. रेल्वेच्या प्रत्येक विभागात एक बोट ठेवण्यात येणार आहे.
हेही वाच - वादळसदृश्य परिस्थिती, मासेमारी बोटींना समुद्रकिनारी येण्याच्या सूचना
हेही वाचा - महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा कहर, राज्यभर सापडत आहेत रुग्ण