मुंबई - मध्यरेल्वे विभागाने श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान उत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवकाळात वाढती प्रवासी संख्या विचारात घेता ही गाडी सुरू करण्यात येणार आहे.
07416 क्रमांकाची उत्सव विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरहून दररोज 11.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 8 वाजता तिरुपतीला पोहोचेल. तर 07415 क्रमांकाची उत्सव विशेष 28 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत तिरुपती येथून दररोज 9 वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दुसर्या दिवशी 4.35 वाजता पोहोचेल.
'या' ठिकाणी थांबणार गाडी
हातकणंगले, मिरज, कुडची, रायबाग, घाटप्रभा, बेलगावी, खानापूर, लोंढा, अलनावार, धारवाड, हुब्बळी, गदग, कोप्पल, हॉस्पेट, तोरणागल्लू, बेल्लारी, गुंटकल, गुट्टी, ताडीपत्री, येर्रागुंटा, कडापा, रेणीगुंटा या ठिकाणी गाडीला थांबे देण्यात आले आहेत.
२८ ऑक्टोबरपासून बुकींग सुरू
गाडीची संरचना 1 प्रथम वातानुकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 12 शयनयान, 4 द्वितीय आसन श्रेणी असणार आहे. 07416 या उत्सव विशेष ट्रेनचे बुकींग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल. केवळ आरक्षित(कनफर्म) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल.