मुंबई - मायानगरी मुंबईतील प्रत्येक ठिकाणाच्या नावामागे रंजक कथा ऐकायला मिळतात. चर्चगेट या ठिकाणाच्या नावामागेही एक कथा आहे. चर्चगेट या स्टेशनला हे नाव कसे पडले याचा शोध घेण्याचा प्रयत्न ई टीव्ही भारतने केला. त्याबाबत हा विशेष रिपोर्ट...
मुंबईतील कुलाब्यात असलेले वुड हाऊस चर्च हे अगोदर फक्त कॅथेड्रल चर्च या नावाने ओळखले जात असे. सध्या जिथे चर्चगेट स्टेशन आहे त्याच्या अगदी समोर हे चर्च होते. स्टेशनमध्ये येणारी गाडी अगदी चर्चच्या गेटसमोर येऊन थांबत असे. त्यामुळे या चर्चच्या दारात म्हणजेच गेटपर्यंत येणारे स्टेशन म्हणून त्याचे नाव चर्चगेट स्टेशन असे पडले.
हेही वाचा - नाशिकच्या 'या' ठिकाणी आहे भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेले बाळ येशूचे मंदिर
मात्र, नंतर कालांतराने या रचनेत बदल झाला. रहदारीसाठी चर्चगेट स्टेशनसमोर रस्ता झाला. त्यामुळे चर्च मागे गेले. त्यानंतर काही काळ हे चर्च भुलेश्वर परिसरात हलवण्यात आले. मग पुन्हा ते चर्चगेट येथील मूळ जागेत आले. मात्र, या भागातील रहदारी वाढत गेल्यामुळे चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची वाहने वाहतुकीसाठी अडथळा ठरू लागली. त्यामुळे पुन्हा चर्चसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला. अखेर वुडहाऊस चर्च कुलाब्यामध्ये कायमस्वरूपी हलवण्यात आले. या चर्चमध्ये दडलेली स्टेशनच्या नावाची दंतकथा फादर शेट्टीगर यांच्यामुळे आपल्याला समजली.
मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये असलेले हे चर्च आजही आपली वेगळी ओळख जपून आहे. चर्चच्या छतावर काढण्यात आलेली चित्रे गॉथिक वास्तुशैलीचा अप्रतिम नमुना आहेत. नाताळ सणानिमित्त अतिशय सुंदररीत्या या चर्चची सजावट करण्यात आली आहे.