औरंगाबाद - देशात कोरोना व्हायरस शिरकाव करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काही राज्यात कोरोना संशयित आढळून आल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे राज्यात सर्वच शासकीय रुग्णालयात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी 5 बेडचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात अत्यावश्यक अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
हेही वाचा - मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. अनेक देशी-विदेशी पर्यटक जिल्ह्यात दाखल होत असतात. त्यामुळे कोरोना व्हायरस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा म्हणून औरंगाबादच्या घाटी रुग्णालय आणि मिनी घाटी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आजार कोणाला आढळून आलाच तर त्या रुग्णावर तातडीचे उपाय झाले पाहिजेत, म्हणून विशेष कक्ष सज्ज करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस होऊ नये, यासाठी आपण स्वतः खबरदारी घ्यायला हवी, कोरोनाला न खबरता त्यासाठी खबरदारी घेणंच योग्य, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
बुधवारी सकाळी महानगरपालिका आणि घाटी येथील वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार कोरोनासाठी यंत्रणा म्हणावी तशी सज्ज नसून काही उपाय योजना तातडीने करण्यासंबंधी राज्य सरकारला विनंती करणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबादमधील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर आयुक्तांचा हातोडा