मुंबई - मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर लहान मुलांना ठेवायचे कुठे? असा मोठा प्रश्न मतदारांना पडलेला असतो. मात्र, आता याची चिंता करण्याची गरज नाही. निवडणूक आयोग मतदारांच्या लहान मुलांची काळजी घेणार आहे. त्यासाठी विशेष कक्ष असणार आहे. त्यामध्ये खाऊ आणि खेळणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.
शहरात दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई असे २ मतदार संघ येतात. या २ मतदार संघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यासाठी जोंधळे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ते बोलत होते.
निवडणुकीसाठी मतदान करताना लहान मुलांना मतदान केंद्रात घेऊन जाता येत नाही. अनेक मतदारांना उन्हात रांगेत उभे राहावे लागते. काही ठिकाणी कित्येक तास रांगेत उभे राहून मतदान करावे लागते. अशावेळी लहान मुलांना ठेवायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी मतदान केंद्रावर एक विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्याची अंमलबजावणी या निवडणुकीपासून करण्यात येणार आहे. या विशेष कक्षात लहान मुलांना सांभाळण्यासाठी एक कर्मचारी आणि एक मदतनीस असणार आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी खेळणी आणि खाऊची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जोंधळे म्हणाले.