मुंबई - लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा भारताची अंतराळ संशोधन संस्था 'इस्त्रो'च्या कार्य कर्तृत्वाला सलाम करणारा देखावा साकारला आहे. भारताने 'चांद्रयान-२'चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांच्या कार्याचे या देखाव्यामधून कौतुक केले आहे.
नुकतेच इस्त्रोने अवकाशात सोडलेले 'चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ मधून लँडर 'विक्रम' ७ सप्टेंबर २०१९ ला पहाटे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अंतराळ क्षेत्रात केलेली प्रगती या देखाव्यात साकारली आहे. त्यामुळे यंदा लालबागचा राजा चांद्रभूमीवर विराजमान झालेला आहे.
भारताच्या 'चांद्रयान २' मोहिमेसोबत भविष्यातील 'गगनयान' या भारतीय अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या मोहीमेसाठीही लालबागचा राजाकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारताला सुपर पॉवर बनवण्यासाठी इस्त्रो ऐतिहासिक कामगिरी करीत आहे. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाचा गौरव लालबागच्या राजाच्या राजेशाही दरबारात पाहायला मिळणार आहे, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.