मुंबई - हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून कमी-जास्त प्रमाणात पाऊस येत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात कुलाबा येथे ३९ मिमी तर सांताक्रूझमध्ये ८०.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दिवसभरात मुंबईत ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर टीटी, सायन रोड नंबर २४, रुईया महाविद्यालय, शेखर मेस्त्री रोड-माटुंगा, बीपीटी कॉलनी, टिळक ब्रीज दादर, अंधेरी सबवे, खार लिंक रोड, खास सब वे या ठिकाणी पाणी साचले होते. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद करून वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली होती. साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
वादळी पावसामुळे मुंबईतील २४ ठिकाणी झाडे पडल्याची व ६ ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या आणि ४ ठिकाणी दुर्घटना घडल्याची नोंद महानगरपालिकेकडे झाली आहे.
दरम्यान, शहरातील काही भागात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. बुधवारी रात्री साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत वांद्रे येथे २०१ मिमी आणि महालक्ष्मी भागात १२९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासात मुंबई उपनगरामध्ये १९१.२ मिमी, तर दक्षिण मुंबईमध्ये १५६.४ मिमी पावासाची नोंद झाली.