मुंबई - दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी मोठ्या शक्तीप्रर्शनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनी दिलेल्या शपथ पत्रात त्यांचे उत्पन्न दर्शवण्यात आले असून दोन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत. देवरा यांच्या संपत्तीत १७ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांनी आपण व्यावसायिक असल्याचे सांगितले तर सावंत यांनी राजकीय तसेच कामगार नेता असल्याचे स्पष्ट केले. आपल्या मासिक पगारातून आणि गुंतवणुकीतून उत्पन्न मिळत असल्याचे सावंत यांच्या प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आले आहे.
देवरा यांच्याकडे १३ कोटी २७ लाखांचे वडिलोपार्जित घर तसेच २३ लाखांची होंडा गाडी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत घट झाली आहे. सावंत यांनी २०१७-१८ च्या प्राप्तिकर विवरणपत्रात १२ लाख १८ हजार रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. तर २०१३-१४ मध्ये त्यांनी १६ लाख ९ हजारांचे उत्पन्न दाखवले होते. ७ कोटी ६९ लाख रुपयांच्या बँक ठेवी असणाऱ्या सावंत यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. शिवडीत भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सावंत यांच्या विविध बँक खात्यात १ कोटी १८ लाख रुपये जमा आहेत.
सावंत यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा हे आतापर्यंत सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. सन २०१३-१४ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये त्यांच्या उत्पन्नात १७ लाख रुपयांची भर पडली आहे. देवरा यांनी आपल्याकडे १ लाख २७ हजारांची रोख रक्कम असल्याचे नमूद केले आहे. देवरा यांच्याकडे ११ लाखाचे तर पत्नीकडे १ कोटी ५० लाख रुपयांचे दागिने आहेत. देवरा यांनी ३३ कोटी ७३ लाख रुपयांची चल संपत्ती दाखवली आहे. विविध बँक खात्यात देवरा यांचे १७ लाख रूपये जमा असून त्यांनी बँकेत २५ लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत.