मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा, अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजूरांची मागणी होती. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती. या ठिकाणी 2 हजारपेक्षा जास्त नागरिक जमा झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाल्याचे पाहायला मिळाले.
या ठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. या संपूर्ण प्रकाराची मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्च केला. त्यानंतर येथील गर्दी ओसरली.
लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मे पर्यंत बंद आहे. राज्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातात कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न या मजूरांपुढे आहे. त्यामुळे आज रेल्वे सुरु होतील आणि आपल्याला आपल्या गावी परतता येईल, अशी आशा या मजूरांना होती. मात्र, ते शक्य नसल्याचे लक्षात येताच या सर्वांच्या संयमाचा बांध फुटला आणि ते रस्त्यावर उतरले. या ठिकाणची गर्दी कमी झाल्यानंतरही येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.