मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुरक्षेला प्राधान्य दिल्याने मुंबईत 5 वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. घाटकोपर पूर्वचे भाजप महायुतीचे उमेदवार पराग शहा यांच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये स्मृती इराणी बोलत होत्या.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घाटकोपर पूर्व सहकार बाजार पंतनगर येथे पराग शहा यांच्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सामान्य महिलांना गॅस सिलेंडर देऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू कमी केले. ज्यावेळी आम्ही काँग्रेस सरकारकडे मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांचे 5 लाख रुपये पर्यंतचे टॅक्स माफ करण्याची मागणी केली. त्यावेळी काँग्रेस सरकार आमची मागणी टाळायचा. पण, देशात परिवर्तन झाले असून नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा - सर्व विरोधी पक्षातील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करू - आमदार अजय चौधरी
महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत असल्याने मुंबईत 5 वर्षाच्या काळात एकही बॉम्बस्फोट झाला नाही. मुंबईत बॉम्बस्फोट झाला त्यावेळी मुंबई स्तब्ध झाली होती. मुंबईतले नागरिक जागोजागी ट्रेनमध्ये अडकून पडले होते. मुंबई बंद झाली. याच वेळी दिल्लीतले सरकार तमाशा पाहत होते. पण, आता 5 वर्षात मुंबई शांत आहे, असे इराणी यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई : विधानसभा निवडणुक प्रक्रियेत प्रशासकीय स्तरावर महिलाराज; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज