मुंबई - शहरात मागील वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरपासून गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र गेल्या काही दिवसात गोवरचा प्रसार आटोक्यात आला आहे. आज गोवरमुळे सायन येथील एका ६ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याने या महिन्यातील मृतांचा आकडा ५ तर आतापर्यंत मृतांचा आकडा २३ वर पोहचला आहे. त्यापैकी २० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहेत. आतापर्यंत निश्चित निदान झालेल्या एकूण ६१३ रुग्णांची तर ५६८२ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.
३ रुग्ण अद्यापही आयसीयूत : मुंबईत १ कोटी ३५ लाख ६० हजार ३५६ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ५६८२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षाच्या जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ६१२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३८ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ६२ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १७३ जनरल बेडपैकी ४७, १२९ ऑक्सीजन बेड पैकी १२, ३५ आयसीयु बेडपैकी ३ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी एकाही व्हेंटिलेटरवर रुग्ण नाही.
मुंबईत आतापर्यंत गोवरमुळे २३ मृत्यू : मुंबईमधील रुग्णालयात नोव्हेंबरपासून आतापर्यंत एकूण २३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मागील वर्षी १८ मृत्यू झाले होते. जानेवारी महिन्यात ५ मृत्यू झाले आहेत. २३ मृत्यू पैकी ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण २० मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. १२ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
आज ६ महिन्याच्या बालकाचा मृत्यू : सायन येथील ६ महिन्याच्या बालकाला ४ जानेवारीला ताप, खोकला, सर्दी झाली होती. ६ जानेवारीला त्याला शरीरावर पुरळ आल्यामुळे त्याला ७ जानेवारीला महापालिका रुग्णालयात आयासीयूमध्ये दाखल केले होते. श्वसन यंत्रणा निकामी झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सर्व आवश्यक उपाययोजना केल्यावरही त्या बालकाची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे आज सकाळी ४ वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - Health Recruitment News : राज्यभरातील रुग्णालयामधील ५ हजार पदे बाह्यस्रोत पद्धतीने भरली जाणार, वर्षाला १०९ कोटींचा खर्च