मुंबई - मला पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने लता दिदींचीच कित्येक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण केल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. वाडकर यांना पद्मश्री या बहुमनाने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा - '30 वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले, आता पाणीदार भारतासाठी काम करणार'
सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या नावाचा पद्म पुरस्कारासाठी विचार व्हावा, यासाठी दीदी गेली 20 वर्ष न चुकता केंद्र सरकारला पत्र लिहीत होत्या, असे वाडकरांनी सांगितले. मात्र, दरवेळी काही ना काही कारणामुळे वाडकर यांना या पुरस्कारापासून वंचित रहावे लागले. मात्र, आज अखेर त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आधी दिदींनीच आपल्याला फोन करून आपलं कौतुक केल्याचे सुरेश वाडकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - 'बीजमाता’ राहीबाई पोपरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
आज हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला माझे आई वडील, माझे गुरू जियालाल वसंत आणि दिवंगत संगीतकार रवींद्र जैन यांची विशेष आठवण येत असल्याचे सुरेशजी म्हणाले. आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय गुरुमाऊली लता मंगेशकर यांच्यासोबत आजवर आपण ज्यांच्यासोबत गाणी गायली त्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार गायक आणि वादकांना जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
हेही वाचा - डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार
कलाकारांच्या आयुष्यात पुरस्काराला एक विशेष महत्व असते. मात्र, तो जर त्याला त्याच्या उमेदीच्या काळात मिळाला तर त्याला तो जास्त हुरूप देऊन जातो.असे वाडकर म्हणाले. गेली अनेक वर्षे आपण संगीत क्षेत्रात कार्यरत असलो तरीही अजिवासन गुरुकुलच्या माध्यमातून संगित शिकवून नवीन पिढी घडवण्याचे काम अथकपणे करत आलो आहे. हे काम करत असल्यानेच कधीही पद्म पुरस्कारासाठी विचार झाला नाही याचे शल्य जाणवले नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, अखेर मायबाप सरकारने या कार्याची दखल घेऊन आपला जो सन्मान केला त्याचा आपल्याला आनंद असून आपण केंद्र सरकार, निवड समिती आणि आपल्या गाण्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.