मुंबई - लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वेळेवर आणि सुरळीत ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रेल्वे कर्मचारी उत्कृष्ट कार्य करत आहेत. या खडतर वातावरणात सिग्नल अॅन्ड टेलिकॉम (एस अॅन्ड टी) विभागाचे तंत्रज्ञ आवेशाने आणि समर्पणाने आपले कर्तव्ये बजावत आहेत. मालगाड्यांची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालवण्यासाठी सिग्नल अॅन्ड टेलिकॉम विभागातील यंत्रणा व्यवस्थित आणि निर्दोश हवी. यासाठी सिग्नल अॅन्ड टेलिकॉम विभागातील कर्मचारी दररोज या यंत्रांची देखभाल करत आहेत.
सिग्नल विभागाचे कर्मचारी सिग्नल पोस्टची देखभाल, रिले रूम, मालवाहक गाड्या सुरक्षित चालवण्यासाठी ट्रॅक मशीन चांगल्या स्थितीत ठेवण्याचे काम करत आहेत. या लॉकडाऊन कालावधीत निरंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला जात आहे. त्यामुळे दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान विभागाची आवश्यकताही अनेक पटींनी वाढली आहे. टेलिकॉम कर्मचार्यांकडून माहितीचा अखंडित प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागातील सिग्नल व दूरसंचारचे अधिकारी, मध्य रेल्वेच्या क्षेत्रिय ( Zonal) मुख्यालयाचे सतत सहकार्य आणि मार्गदर्शन घेऊन सिग्नलिंग व टेलिकॉमवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सिग्नल आणि दूरसंचारचे वरिष्ठ विभागीय अभियंता कर्मचाऱयांचे मनोबल वाढवण्यासाठी नियमितपणे प्रेरणा देत आहेत.
या कर्मचाऱयांना वैयक्तिक स्वच्छता तसेच मास्क घालण्याची आणि आपली कर्तव्ये पार पाडताना सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विभागातील अभियंते कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक तंत्रज्ञांना मास्क, सॅनिटायझर, साबण आणि हातमोज्यांचे वाटप करत आहेत. दररोज कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जात आहे. सामाजिक संपर्क टाळण्यासाठी कर्मचारी रोटेशननुसार कर्तव्यावर येत आहेत.
या व्यतिरिक्त कर्मचार्यांचे कुटुंबीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांसाठी मास्क तयार करत आहेत. आत्तापर्यंत सिग्नल अॅन्ड टेलिकॉम विभागातील कर्मचार्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी स्वेच्छेने एकूण 900 मास्क तयार केले आहेत तर आणखी 400 मास्क तयार करण्यात येत आहेत.