मुंबई- सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयचे पथक सलग 7 दिवसांपासून तपास करीत आहेत. आज मुंबईतील सांताक्रूज येथील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी सिद्धार्थ पिठाणी व रिया चक्रावर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती हे दोघे हजर झाले आहेत. तसेच सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज सिंह व केशव हे दोन कर्मचारीदेखील सीबीआय समोर हजर झाले आहेत. सीबीआय पथकाकडून शोवीक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज सिंग व केशव या चौघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.
सिद्धार्थ पिठाणी आणि शोविक चक्रवर्ती सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी हजर
सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सीबीआय करीत असून यातील आर्थिक व्यवहारांचा तपास ईडी करीत आहे. रिया चक्रवर्तीचे ड्रग्स डीलर सोबतचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा तपास कामात गुंतले आहे. दरम्यान, रियासह चार जणांविरोधात एनसीबीने गुन्हा नोंदविला असून एनसीबीची एक टीम गोवा येथे तपासासाठी पोहोचली आहे.
सिद्धार्थ पिठाणी आणि शोविक चक्रवर्ती सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी हजर; स्वयंपाकी निरज आणि केशवचीही चौकशी होणार सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याची सीबीआयने आतापर्यंत सलग 6 दिवस चौकशी केली आहे. 13 जून व 14 जून रोजी सिद्धार्थ पिठाणी हा सुशांतसिंह सोबत संपूर्ण वेळ होता. 14 जून रोजी सुशांत त्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात येताच सिद्धार्थनेच याबद्दल सुशांतची बहीण मितु सिंहला कळविले होते. सुशांतच्या बेडरूमचा दरवाजा उघडण्यासाठी सिद्धार्थ पिठाणीनेच चावी बनविणाऱ्या व्यक्तीला बोलवून त्यास दरवाजा उघडण्याचे 2 हजार रुपये दिले होते. मात्र, हा दरवाजा उघडताच चावी बनविणाऱ्या व्यक्तीला घरातून तत्काळ निघून जाण्यास सांगितले होते. सुशांतसिंहच्या घरी आठवड्यातून 2 वेळा पार्टी केली जात असे, यावेळी सिद्धार्थ पिठाणी हा सुद्धा असायचा. या पार्टीत सिद्धार्थ पिठाणीने काही वेळा सुशांतला गांजा ओढण्यासाठी रोल बनवून दिले होते, असे सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंह याने त्याच्या जबाबात म्हटले आहे.