मुंबई - कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य रथयात्रा काढण्यात आली. ढोल पथक आणि ताशांच्या गजरात हरिनामाचा गजर घुमला. या रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माघी गणेश जयंतीनिमित्त रविवारी अथर्वशीर्ष, पूजा, कीर्तन, सामुदायिक नामस्मरण, भजन, आरती आणि गणेश जन्मोत्सव मंदिरात साजरा करण्यात आला. मंगळवारी श्री सिद्धिविनायकाची प्रभादेवी परिसरातून भव्य रथयात्रा काढण्यात आली. यावेळी रथ फुलांनी सजविण्यात आला होता. तसेच फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने मंदिर परिसराला झळाळी प्राप्त झाली.
हेही वाचा - खेळाने मला आयुष्याच्या वेगळ्या वळणावर नेले - सचिन तेंडुलकर
रथयात्रेत विविध ढोलांचा गजर घुमत होता, सोबतच बाल गणेशभक्तांनीही विठूनामाचा गजर घेत दिंडी काढली. रथयात्रा सायंकाळी मंदिरापासून पोर्तुगीज चर्च, सैतान चौकी, प्रभादेवी परिसरातून काढण्यात आली. रथावर पुष्पवृष्टी आणि वंदन करण्यासाठी प्रभादेवी, आगर बझार परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले होते.
हेही वाचा - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत #CAA, #NRC विरोधात ठराव मंजूर करावा'