मुंबई - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 141 च्या निवडणुकीचा निकाल आज(शुक्रवार) लागला. या निवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले विठ्ठल लोकरे विजयी झाले. हा विजय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेकडून गिफ्ट असून यापुढेही पालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल अशी प्रतिक्रिया विठ्ठल लोकरे यांनी यावेळी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४१ मधील काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केल्याने याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत ४२ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीपेक्षा हे मतदान १४ टक्के कमी झाल्याने याचा नेमका फायदा कोणाला होईल अशी चर्चा होती. मतमोजणीनंतर भाजपचे दिनेश पांचाळ यांना ३०४२ तर, शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांना ४४२७ मते मिळाली. यात लोकरे यांचा १३८५ मतांनी विजय झाला. तर, ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी झाली.
आपल्या विजयाबाबत पत्रकारांशी बोलताना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हे शिवसैनिकांनी दिलेले छोटेसे गिफ्ट आहे. हा विजय हा येणाऱ्या पालिका निवडणुकीची नांदी आहे. पालिकेत सध्या भाजपचे ८० हून अधिक नगरसेवक आहेत. ती संख्या १५ ते २२ होईल, येणाऱ्या लोकसभेतही भाजपच्या जागा कमी होतील असा दावा लोकरे यांनी केला. महाविकास आघाडी झाली नसली तरी याठिकाणी अंतर्गत महाआघाडी झाली होती. सर्व पक्षीयांनी आम्हाला मदत केली. काँग्रेस, भाजपानेही आम्हाला मदत केली आहे. राष्ट्रवादीने आम्हाला खुला पाठिंबा दिला होता. याचा संदेश सर्वत्र जाऊन महापालिकेच्या यापुढे ज्या निवडणुका होतील त्यात महाविकास आघाडीचाच विजय होईल असे लोकरे म्हणाले.
हेही वाचा - बेकायदेशीर पार्किंग प्रमाणे फेरीवाल्यांकडूनही जबर दंड आकारावा, भाजप नगरसेवकाची मागणी
विभागात मोठे प्रकल्प पूर्ण व्हावेत म्हणून मी छोटासा त्याग केला आणि त्याचेच फळ म्हणून जनतेने मला पुन्हा निवडून दिले. या विजयाचे श्रेय उद्धव ठाकरे, जनतेला, शिवसैनिकांना, पत्नी आणि ज्यांनी निवडणुकीत काम केले त्या सर्वांना असल्याचे लोकरे म्हणाले. या विभागातून जे आमदार म्हणून निवडून गेले आहेत ते अबू आझमी धर्माच्या नावावर निवडून येतात. त्यांच्याकडे कोणतेही प्रकल्प किंवा पॉलिसी त्यांच्याकडे नसतात अशी टीकाही लोकरे यांनी यावेळी केली.
हेही वाचा - मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा साहित्य संमेलनात विसर; 'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाडांना साधे निमंत्रणही नाही