मुंबई - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागा वाटप जवळपास पूर्ण झाले असताना अद्याप युतीच्या जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. जागा वाटपावरून भाजप-सेनेचे जमेल असे चित्र दिसत नाही. ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर शिवसेनेकडून १४४ जागांची मागणी आहे, ही मागणी भाजपकडून मान्य होण्याची शक्यता फारच कमी दिसते. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात त्यांना अधिक जोमाने उतरावे लागणार आहे.
हेही वाचा - तुम्हाला माहीत आहे का, आपल्या आमदारांना नक्की पगार मिळतो किती?
शिवसेनेची खरी मदार ही मुंबई, ठाणे आणि कोकणात आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघ, ठाण्याचे २४ आणि कोकणातील (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) १५ अशा एकूण ७५ मतदारसंघावर शिवसेनेने लक्ष्य केंद्रीत केले आहे. गत विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील १० पैकी ६ मतदारसंघावरही शिवसेनेने भगवा फडकवला होता. त्यामुळे युतीत बिघाडी झाल्यास या मतदारसंघांवरही शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
कोकणात सध्या शिवसेनेला मोठा विरोधक नाही. त्यामुळे तिथल्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर शिवसेनेचा भर असणार आहे. भाजप हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणी कोकणात आहे. थोडीफार प्रतिकार सिंधुदुर्गात होऊ शकतो. नारायण राणे सिंधुदुर्ग तीनही मतदारसंघात शिवसेनेला टक्कर देऊ शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोकणातील अस्तित्व नगण्यच म्हणावे लागेल. त्यामुळे इथल्या सर्व जागा कशा जिंकता येतील याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे.
हेही वाचा - लै खास, मी काय म्हातारा झालोय का? पवारांची फटकेबाजी
मुंबईतील ३६ आणि ठाणे जिल्ह्यातील २४ जागांवरही मुसंडी मारण्याची शिवसेनेची रणनिती आहे. या ठिकाणी भाजपला शह दिल्यास शिवसेनेला राज्यात क्रमांक एकचा पक्ष होण्याची संधी आहे. मात्र, मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेसमोर भाजपचेच तगडे आव्हान आहे. ते आव्हान परतवून लावण्यासाठी शिवसैनिकांना जिवाचे रान करावे लागणार आहे. याची कल्पना पक्षनेतृत्वाला असल्याने या ठिकाणी शिवसेनेने आपले कामही सुरू केले आहे.
सध्या शिवसेनेचे मुंबईत १३, ठाण्यात ६ तर कोकणात ७ आमदार आहेत. स्वबळावर लढताना विद्यमान जागांसह आणखीन जास्तीत-जास्त जागा शिवसेनेला जिंकाव्या लागतील. सध्याच्या स्थितीत मुंबई ठाणे आणि कोकणातील ७५ पैकी ५० जागा जिंकण्याची रणनिती शिवसेनेने तयार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यातील बहुतांश नेत्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार हे नक्की आहे. त्यांनी विजयश्री खेचून आणल्यास शिवसेनेला फायदा मिळणार आहे.
हेही वाचा - मनसेचं अस्तित्वच धोक्यात? नेते संभ्रमात तर कार्यकर्ते कोमात!