मुंबई - आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दसरा मेळावा होणार आणि तोही जोरदार असे या अगोदरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले होते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजचा दसरा मेळावा दमदार होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात फोडला जाणार आहे. संध्याकाळी जेव्हा उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहतील तेव्हा विजायदशमीनिमित्त जी शस्त्रं काढली जातात ती कोणासाठी कशासाठी काढली जातात हे कळेल, असे सूचक व्यक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत केले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजचे भाषण महत्त्वाचे आहे. देशात काही महिन्यापासून महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. राज्यातदेखील अनेक घडामोडी झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मेळावा होऊ शकत नाही. त्यामुळे षणमुखानंद हॉलमध्ये नियमांचं पालन करुन आजचा मेळावा होईल. त्यातून महाराष्ट्राला, देशाला, राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा - हिंदुस्तान बेशरम लोकांचा देश असून निर्लज्जपणातही क्रमांक एकवर - संभाजी भिडे
त्या चिंतेशी सहमत -
सरसंघचालक मोहन यांनी केलेल्या वक्तव्याला संजय राऊत यांनी सहमती दर्शवली आहे. भागवत यांनी संघाच्या विजयदशमी उत्सवात बोलताना ड्रग्ज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला होता. भागवत जे म्हणाले आहेत ते बरोबर बोलले आहेत. जर नार्कोटिक्स, ड्रग्जचा पैसा देशविरोधात कोणी वापरत असेल तर मग सरकार काय करतंय? सरकार कोणाचं आहे? सरकारचं प्रमुख कोण आहे? नोटबंदी केल्यानंतर मोदींनीच ड्रग्जचा पैसा जो दहशतवादी, माफियांना मिळतो तो बंद होईल असं सांगितलं होतं. मात्र, जर असं झालं नसेल तर सरसंघचालकांची चिंता योग्य आहे. आम्ही त्या चिंतेशी सहमत आहोत, असे राऊत म्हणाले.