मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तीनही पक्षांमधील विविध नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून असंतोष पहायला मिळत आहे. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी तर पुण्यातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाची तोडफोड केली. शिवसेना राडेबाज आहे, असा शिक्का काँग्रेसकडून अनेकदा मारला जात होता. पण, थोपटे समर्थकांनी केलेले कृत्य राडा संस्कृतीत मोडणारेच आहे. पण, राडा हा शब्द काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही, असे म्हणत पुण्याच्या तोडफोडीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.
त्याचबरोबर काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मंत्रिमंडळात आले. त्यामुळे त्यांना प्रतिष्ठेला शोभणारे खाते मिळायला हवे. ते खाते म्हणजे महसूल खाते. पण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या महसूल खाते आहे. त्यामुळे त्याबाबत कसा निर्णय लागतो ते पहावे लागेल, असे सामन्यात म्हटले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांना अनेक पदे गांधी परिवार आणि काँग्रेसमुळे भूषवता आली
सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनाही मंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांच्याही समर्थकांत मोठी नाराजी आहे. प्रणिती शिंदे या कर्तबगार आहेत व मंत्रीपदासाठी योग्य होत्या. पण, काँग्रेसच्या वाट्याला जो बाराचा कोटा आला त्यात त्यांना बसवता आले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराज समर्थकांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना रक्ताने पत्रे लिहिली. पण, मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंतची पदे सुशीलकुमार शिंदे यांना गांधी परिवार आणि काँग्रेसमुळे भूषवता आली. हे प्रणिती शिंदेंच्या समर्थकांनी समजून घ्यायला हवे.
शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे म्हणणे मांडले. ते राष्टवादीतून शिवसेनेत येताना उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिल्याचे म्हटले आहे. यावर शिवसेनेत सामील व्हा. एकत्र काम करू, असा शब्द नक्कीच उद्धव ठाकरे यांनी दिला असावा, असे सामनातून म्हटले आहे.
यांना दिला होता मंत्रीपदाबद्दल शब्द
आमदार बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावकर यांना उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यास मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. त्यांनी दिलेले हे शब्द पाळल्याचे सामनातून म्हटले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे हायकमांडसाठी डोकेदुखीच
मंत्रिमडळाच्या विस्तारानंतर ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही, असे अनेक आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादीचे माजगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी धक्का दिला. आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणालाच रामराम ठोकण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना त्यांची समजूत घालून सोळंकेंची नाराजी दूर केली. काही जणांना आनंदवार्ता असली तरी हायकमांडसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे सामनातून म्हटले आहे.