मुंबई: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर केलेल्या हल्ल्यामागे फार मोठे षडयंत्र आणि कारस्थान आहे. भाजपच्या नेत्यांकडून मग ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील किंवा राष्ट्रीय प्रवक्ते त्रिवेदी असतील, यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेय त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकचा वापर केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
भाजप शिस्तबद्ध पक्ष: पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजप हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. याआधी तुम्ही कधी पाहिले का ? गुजरातचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. किंवा भाजपच्या अन्य राज्यातील मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांवर टीका करतात ? त्यामुळे हा एक प्लॅनिंग केलेला वाद आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून बोमई यांना एक स्क्रिप्ट देण्यात आलेय आणि त्यानुसार ते बोलत आहेत. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
एक ईंचंही कर्नाटकला देणार नाही: ज्यांना वाद करायचा आहे त्यांना करू द्या. पण, लक्षात ठेवा याच शिवसेनेने संयुक्त महाराष्ट्रासाठी 69 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे एक इंच काय एक विद सुद्धा आम्ही महाराष्ट्राची जमीन कर्नाटकच्या घशात जाऊ देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचे आणखी हुतात्मे गेले तरी बेहत्तर. सरकार दुबळंय, पण शिवसेना नाही. टाका तुरूंगात आम्ही भित नाही. असा थेट इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
तेव्हा संजय राऊतला अटक केली: राज्यपाल हे नेहमीच काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मागे काही महिन्यांपूर्वी राज्यपालांनी ठाण्यामध्ये एका कार्यक्रमात मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले तर मुंबईचा आर्थिक विकास थांबेल, मुंबईत पैसे राहणार नाहीत. असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अखेर हा वाद थांबवण्यासाठी संजय राऊतला अटक करण्यात आली. हे त्यांची स्क्रिप्ट रेडी असते आता देखील तसंच होतं आहे.
महाराष्ट्राच्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान लोकांनी विसरावा, म्हणून सीमावरती भागाचा प्रश्न काढून लोकांचा उद्रेक थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांनी एक लक्षात ठेवावं, कितीही कारस्थान केली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. या विरोधात आता उद्धव ठाकरेंनी देखील रणशिंग फुंकलेल आहे. महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत. आणि ही लढाई कोणत्याही थराला जाऊ शकते.
पुढच्या दोन महिन्यात सत्ता योग नाही: पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'राज्याचा या खोके सरकारवर विश्वास नाही. यांना खोके दिले की हे सारं विसरतात. उद्धव ठाकरेंनी याविरोधात आता रणशिंग फुंकलंय आणि हा लढा फार मोठ्या स्तरापर्यंत जाणार आहे. गुवाहाटीला जाऊदेत किंवा लंकेत ४० आमदारांचे लोकांमधुन नामोनिशाण नाहीसे झाले आहे. 2 महिन्यांनंतर त्यांच्या कुंडलीत सत्ता योग नाही, मलाही कुंडली बघता येते. ज्यांना तंत्रमंत्र करायचेत, भविष्य पाहायचेत त्यांनी पाहून घ्या त्यांचा स्वत:वर विश्वास नाही. हे स्पष्ट होतं. मलाही भविष्य कळतं, पुढच्या 2 महिन्यांत त्यांच्या पत्रिकेत सत्तायोग नाही. असा टोला देखील खासदार राऊत यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केला निषेध: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दोन्ही राज्यांमधील सीमावादावर केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील 40 गावांवर अचानक दावा केल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ताब्यात आल्यासारखे वाटते. या वादावर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठायला हवा, असे आवाहन केले.