मुंबई - मुंबई मेट्रोसाठी आवश्यक कारशेडच्या जागेचा वाद न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयानेही ठाकरे सरकारला झटका दिला. कांजूरमार्ग येथील कामाला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, कारशेड कांजूरमार्गलाच होणार, असा पुनर्उच्चार शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एका सभेत केला आहे. यावेळी त्यांनी कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामात आडकाठी आणणाऱ्या विरोधकांचाही समाचार घेतला आहे. शुक्रवारी विक्रोळीतील उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते
उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत पोहोचावायचे आहे-
राऊत पुढे म्हणाले, आपल्या सर्वांना उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत पोहोचवायचे आहे. आपले पुढचे लक्ष हे दिल्ली आहे. आपला पंतप्रधान पाहिजे आणि तो होणारचं. तसेच मुंबई मेट्रोसाठीचे कारशेड हे कांजूरमार्गलाच होणार, कुणीही कितीही अडथळे आणू द्या किंवा उद्या कोर्टाने काहीही आदेश दिला तरी मला माहिती आहे. विरोधकांनी मेट्रोचे काम बंद करून दाखवावेच, असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले.
पुढल्या पाच वर्षात देखील आपलाच मुख्यमंत्री होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलेले आहे. तो साचा वेगळाच असून, तो कुठेही मिळणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील ही शिवसेना देशामध्ये अजिंक्य आहे, हे लक्षात ठेवा, म्हणूनच 105 आमदार घरी बसवले, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्ष भाजपाला लगावला.
पुढच्या वेळी शिवसेनेचे 105 आमदार असतील-
भाजपवर टीका करताना राऊत यांनी 'यावेळी शिवसेनेने भाजपच्या १०५ आमदारांना घरी बसवलेच आहे. आता त्यांचे १०५ आमदार आहेत. मात्र, पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असा विश्वासही व्यक्त केला. तसेच सध्या भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली जात आहे. मात्र, महानगरपालिकेतला भगवा आपण विरोधकांच्या छाताडावर पाय ठेवून अधिक उंचावर नेऊ असा टोलाही संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.