मुंबई Shivsena MLA Disqualification Result : महाराष्ट्रासह सबंध देशाचं लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाहीर करणार आहेत. आज सायंकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळं राज्यातील नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं.
आज देणार निकाल : शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, तीन महिन्यांच्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठक : शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी निकालाला काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर हे सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल घोषित झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेवर याचा कुठलाही परिणाम होऊ नये, या संदर्भातसुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ही बैठक सुमारे एक तास 50 मिनिटं चालली.
निकालाचा शिंदे गटावर काय परिणाम होणार : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री दुपारी पूर्वनियोजित हिंगोलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आजच्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा फार महत्त्वाच्या असणार आहेत. आजचा निकाल शिंदे यांच्या विरोधात गेल्यास राज्यात सरकार कोसळणार का? एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल का? शिंदे यांच्या विरोधात निर्णय गेल्यास त्यांना निवडणूक आयोगानं बहाल केलेले पक्ष आणि चिन्ह हे सुद्धा पुन्हा त्यांच्याकडून घेतलं जाईल का? असे अनेक प्रश्न आजच्या निकालावर अवलंबून असणार आहेत. त्यामुळंच या निकालाकडं सबंध देशाचं लक्ष लागलंय.
उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? : दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाविरोधात निकाल गेल्यास त्यांचे आमदार अपात्र ठरतील. तसंच निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिलेला पक्ष आणि चिन्ह यावर शिक्कामोर्तब होईल. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल लागल्यानंतर ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील निकाल येण्यास बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना व त्यांच्या गटाला हा फार मोठा झटका असणार आहे.
शिंदे गटाच्या या 16 आमदारांवर आहे अपात्रतेची तलवार :
1) एकनाथ शिंदे
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव
6) संदीपान भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे
हेही वाचा :