मुंबई - सिंधुदुर्गमधील खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना शिवसेनेने पाण्यात सोडले. आम्ही तसे वागलो तर आज शिवसेनाच उरली नसती असा टोला लगावला होता. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, “१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात (मला वाटतं मुरली देवरा) म्हणाले होते की शिवसेना संपेल. पुन्हा २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असेच म्हटले होते आणि दोन्हीवेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली. जय महाराष्ट्र.!" अशा शब्दांमध्ये राऊत यांनी अमित शाहांना उत्तर दिले. आज देखील संजय राऊत यांनी एक कविता पोस्ट करत भाजपला टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते अमित शाह -
'मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आले. तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेने चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे, तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी येथे सरकार स्थापन करण्यात आले आहे. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. शिवसेना म्हणते की, आम्ही वचन तोडले. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसे आहोत. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिले होते की एनडीएचे सरकार आले, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आम्ही आमचा शब्द पाळला. महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेला शब्द दिला नव्हता, अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला सुनावले होते.