मुंबई - कोरोना विषाणूमुळे राज्यात भीषण परिस्थिती असताना दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज कंगना वादावर 'नो कमेंट' असे म्हणत काहीही बोलण्यास नकार दिला.
'आज दिवसभर मी कार्यालयामध्ये होतो. मी काहीही पाहिलेले नाही, मला आज काहीच माहिती नाही,' असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संजय राऊत माहिती नाही, एवढेच म्हणाले. तसेच कंगनाला महापालिका 'क्वारंटाईन' करणार का? असा प्रश्नही संजय राऊत यांना विचारला, तेव्हा याबाबत महापौर सांगतील असे ते म्हणाले. सामना कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
विधीमंडळात काल कंगना रणौत विरोधात हक्कभंग दाखल झाल्यानंतरही ती आज मुंबईत पोलीस बंदोबस्तात दाखल झाली. खबरदारी म्हणून कंगना विषयावर बोलू नका, आंदोलनेही करू नका, असे सक्त आदेश मातोश्रीवरून पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या काही भागाचे पाडकाम महापालिकेने केले. याबाबत न बोलण्याचा पक्षादेश शिवसेनेने दिला आहे. मुंबई मनपाने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप भाजपने केला. कंगना प्रकरणावर शिवसेनेने मात्र आता मौन बाळगले आहे. होईल ती कायदेशीर कारवाई, अशीच भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
हेही वाचा - आम्ही जीवाचं रान करून आरक्षण टिकवलं, पण यांनी ते घालवलं...
कंगनाच्या कार्यालयातील काही भाग अवैधरित्या बांधल्याचे सांगत बीएमसीने या कामावर बुलडोझर चालवला. पण, मुंबई उच्च न्यायालयाने पाडकामाला स्थगिती दिल्यानंतर हे काम दुपारी स्थगित करण्यात आले.
दरम्यान, कंगना काही वेळापूर्वी मुंबईमध्ये दाखल झाली. त्यावेळी विमानतळावर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडून आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. कंगनाने पुन्हा ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईवरून संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा - सत्तेच्या ताकदीचा दुरुपयोग बरा नव्हे, नवनीत राणांची शिवसेनेवर टीका