मुंबई - गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) प्रचाराचा धुरळा लवकरच उडणार ( Shivsena Election Campaign ) आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) हे मुख्य चेहरा, खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) , मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) , खासदार अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांच्या सारखे स्टार प्रचारक उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या आठवड्यात प्रचार प्रमुखांची यादी जाहीर होईल. दरम्यान, भाजपने सत्ता स्थापनेसाठी देशभरात केलेला घोडाबाजार, गोव्यातील ऑपरेशन लोटसबाबत ( Operation Lotus ) शिवसेनेकडून तोंडसुख घेतले जाईल. भाजपला डोईजड ठरतील, अशा मुद्द्यांवर शिवसेना भर असणार आहे.
पाच राज्यात रणधुमाळी - पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. कॉंग्रेस ( Congress ), भाजप ( BJP ), सपा ( SP ), आमआदमी पार्टी ( AAP ), शिवसेना ( Shivsena ), राष्ट्रवादी ( NCP ), तृणमूल कॉंग्रेस ( TMC ), स्थानिक प्रादेशिक पक्षांनी मोट बांधली आहे. आपल्या योजना, मोहिम आणि निर्णय मतदारांपर्यंत पोहaचवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. प्रचारावर निर्बंध असतील. येत्या काही दिवसांत कोरोना आटोक्यात येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे जवळपास प्रचाराचा कार्यक्रम आखला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Minister Amit Shah ) यांच्यासह अनेक मंत्री प्रचारात उतरतील. काँग्रेसकडून राहुल गांधी ( Rahul Gandhi ), प्रियंका गांधी वाड्रा ( Priyanka Gandhi ) हे प्रमुख चेहरे असतील. आपचे अरविंद केजीरवाल ( Arvind Kejriwal ), तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ), प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) प्रचारात उतरतील. राष्ट्रवादी तीन राज्यात तर शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
उत्तर प्रदेशात 50 जागांवर लढणार - उत्तर प्रदेश विधानसभा मतदार क्षेत्रात भाजपची सत्ता आहे. सर्वाधिक जागा ज्या पक्षाला मिळतात. तो देशात सत्ता परिवर्तन करतो. उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर त्यामुळे सर्वांचा फोकस आहे. पण, कोरोना काळात भाजपने नागरिकांना वाऱ्यावर सोडले, असा मतदारांचा आरोप आहे. त्यामुळे भाजपविरोधात सध्या संतापाची लाट असून मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. तर समाजवादी पक्ष जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. शिवसेनाही या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. सुमारे 50 जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. या उमेदवारांना मतदार कशाप्रकारे साथ देतील, हे चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
गोव्यात धूळ चारण्यासाठी शिवसेना सज्ज - गोवा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही. भाषिक मतदारांना गोजरण्यासाठी शिवसेना स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. दहा ते बारा जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गोव्यात कॉंग्रेसला चांगलेच यश मिळाले होते. पण, भाजपने ऑपरेशन लोटस ( Operation Lotus ) राबवून सत्ता स्थापन केली. शिवसेना आता भाजप विरोधात रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेची मोठी ताकद नाही. मात्र, भाजपच्या आक्रमकतेला लगाम घालण्याचे काम शिवसेना करू शकते. त्यामुळे शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांची फौज भाजपविरोधात प्रचारात उतरणार ( Shivsena Election Campaign ) आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे आगामी निवडणुकींची धूरा युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हाती असणार आहे. संजय राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, उदय सामंत, दिवाकर रावते, गुलाबराव पाटील, नितीन बालगुडे-पाटील हे या निवडणुकीत स्टार प्रचारक असतील. सेनेची भाजप सोबत 25 वर्षे युती होती. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर शिवसेनेची फरपट केली. महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन याचे उट्टे शिवसेनेने काढले. आता गोव्यात भाजपला धुळ चारण्यासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
आदित्य ठाकरेवर जबाबदारी - गोव्यात अनेक मतदारसंघात काँग्रेसचा पगडा आहे. कॉंग्रेस-शिवसेनेसोबत युतीची शक्यता धुसर आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हातमिळवणी करेल. पण, तृणमूल काँग्रेस, आपमुळे कॉंग्रेसची मतविभागणी होऊन याचा भाजपला फायदा होऊ शकतो. पण, शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य केले जाईल. आतापासून व्युहरचना आखली जात आहे. कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर प्रचारसभेत भर द्यावा, याबाबत व्युहरचना ठरवली जात आहे. सध्या आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. संजय राऊत, अरविंद सावंत, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्या सारखे आक्रमक नेते आदित्य ठाकरे यांना साथ देतील. दादरा नगर हवेलीच्या पोट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या भाषणाचा प्रभाव दिसून आला होता. गोव्यातही शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना लीड केले जाईल, असे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी 'ईटिव्ही भारत'कडे व्यक्त केले.