मुंबई - चीनच्या सीमेवर मोठा धूमधडाका सुरू आहे. गलवान खोऱ्यात चीन आणि भारत या दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये आपल्या काही जवानांना वीरमरण आले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी चर्चा सुरू असतानाच चीनने पुन्हा एकदा पँगॉग सरोवर परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न हिंदूस्थानी जवानांनी हाणून पाडला. हे आपल्या जवानांचे शौर्य आहे. सीमेवर सर्वकाही आलबेल आहे, असे वाटत नाही. परराष्ट्रमंत्री जयशंकर हे ट्विटरवर सांगतात त्यापेक्षा परिस्थिती वेगळी असावी. पण, खरे बोलायचे कोणी? हा प्रश्नच आहे, अशी टीका शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केली आहे.
चीनचे लष्कर लडाख सीमेवर सतत आगळीक करत आहे. चीन धोकेबाज आहे. चीनवर विश्वास ठेवता येत नाही. सीमेवरील तणाव निवळावा यासाठी दोन देशांतील लष्करी अधिकाऱ्यांत चर्चा सुरू आहे. चर्चेचा निकाल लागलेला नाही. तरीही चीनवाले सीमेवर जो तांडवी उद्योग करत आहेत. तो चीनचा मूळ स्वभाव आहे व तो जाणार नाही. 29 ऑगस्टच्या रात्री साधारण 2 वाजता 200 चिनी सैनिकांनी रणगाडे व इतर शस्त्रसाठ्यांसह चूशूल जनरल क्षेत्रात घुसखोरी केली. चिनी सैनिकांची ही घुसखोरी म्हणजे रात्रीच्या अंधारात केलेला हल्लाच होता. पण आपल्या सैनिकांनीही बंदुका ताणून चिन्यांना रोखले, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. पण चिन्यांचा कांगावा असा की, जयशंकर जे सांगत आहेत तसे काही घडलेच नाही. चिनी सैनिकांनी कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही व दोन शब्दांत याबाबत चर्चा सुरू असल्याचे चीन कडून स्पष्ट करण्यात आले. अर्थात चीनने कितीही आपटली तरी आपण जयशंकर यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.
5 मे रोजी देशांच्या सैन्य तुकड्यांत पँगॉग सरोवर भागात हिंसक चकमकी झाल्या. दोन देशांच्या सैन्यांत अशा चकमकी होतात व त्यात वीसेक जवानांचे प्राण जातात व शंभरावर जखमी होतात. तेव्हा चकमक म्हणत नाही, तर त्याला युद्ध म्हणायला हवे. पाकिस्तानच्या बाजूने काश्मीर खोऱ्यात अशी चकमक घुसखोरी केली जाते, तेव्हा त्यास छुपे युद्ध असेच म्हटले जाते. पाकिस्तानला कसे चोख उत्तर दिले याच्या शब्दबार उडवले जातात. मात्र, चीनच्या बाबतीत पंतप्रधानांनी मौन बाळगल्याप्रकरणी वेगळा न्याय दिसत असल्याची टीका करण्यात आली आहे. तसेच चीनची घुसखोरी व हिंदूस्थानी सैन्याचा प्रतिकार याबाबत परराष्ट्रमंत्री देशाला माहिती देत आहेत, हा चिंतेचा विषय आहे. यावर एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसमोर येऊन खरे काय ते सांगायला हवे. निदान संरक्षण मंत्री यांनी बोलायला हवे, असेही शिवसेनेने म्हटले.
पेच प्रसंग संपलेला नाही व जयशंकर यांच्यामते लडाख सीमेवरील स्थिती 1961-62 पेक्षा भयंकर आहे. हे मत जयशंकर यांचे व्यक्तिगत असू शकत नाही, अशी शंका देखील अग्रलेखात उपस्थित करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मत काय आहे? त्यांनी हिंदुस्तानी सैन्याची व्यूहरचना कशी केली आहे, हे महत्त्वाचे आहे. राजनाथ सिंह आता रशियात होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. तेथे ते चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार नाही. तसेच एकत्र युद्ध सरावात हिंदूस्तान सहभागी होणार नाही, असे आता सांगण्यात येत आहे. राजनैतिक पातळीवर दिलेले प्रत्युत्तर चांगलेच आहे. पण सैनिकी पातळीवरही आपण काय करीत आहोत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
केंद्रात कोणाची सत्ता आहे व कोण नेतृत्व करीत आहे याच्याशी सीमेवरील सैन्याला देणेघेणे नसते. नियंत्रण रेषेवरील कमांडरचे आदेश सैन्य पाळत असते. 1971 व त्याआधी 1965 चे युद्ध आमच्या सैन्याने जिंकले. कारगीलचे युद्धही सैन्यानेच जिंकले. 1962 चे चीन बरोबरचे युद्ध आपण हरलो. पण आजचा हिंदूस्तान वेगळा आहे, याची जाणीव असायला हवी. दोन देशात चर्चा सुरू आहे. पण मार्ग निघत नाही, अशी पाकिस्तानबरोबर गेले 60-65 वर्षे चर्चा सुरू आहे, अशीही टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.